Site icon Trekraw

Complete information and experience on Visapur fort trek.

किल्ले विसापूर (Visapur fort):

जुलै महिना म्हणजे पर्यटक, गिर्यारोहक यांच्यासाठी मेजवानीच! जून महिन्यात पहिला पाऊस झाला, मातीचा सुगंध वातावरणात दरवळू लागला की मग हळू-हळू नित्यानेच पावसाच्या सरी सर्वत्र कोसळू लागतात, दऱ्याखोऱ्या हिरवळीच्या गालीच्यांनी नटू लागतात; मोठ्या मोठ्या  वृक्षांनाही नव्या पालव्या फुटू लागतात आणि अशाच मोहक वातावरणात निसर्गप्रेमींची पावले सह्याद्रीच्या डोंगर दार्यांकडे वळू लागतात!

सह्याद्री पर्वत म्हणलं की तिथे शिवरायांनी बांधलेले किल्ले हे ओघाने येतातच व हेच किल्ले या विशाल पर्वतरंगांमध्ये आपल्या संस्कृतीची एक छाप सोडून जातात. हे सर्व किल्ले अर्थातच एक ऐतिहासिक वस्तू म्हणून पण त्याहूनही अधिक, धबधबे, डोंगर-दऱ्या, दाट जंगल अशा निसर्गरम्य वातावरणासाठी एकदिवशीय भटकंती म्हणून एक उत्कृष्ट पर्याय ठरतात!

पावसाळ्यातील विसापूर

छायाचित्र: कौशिक आपटे

प्रस्तावना: 

विसापूर हा पुण्यापासून ५२ किलोमीटर उत्तरेला असलेला तसा काहीसा दुर्लक्षित किल्ला. समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर असलेला हा किल्ला, गर्द झाडी, नेत्रदीपक निसर्गसौंदर्य आणि अतिशय उंचावरून कोसळणारे धबधबे यामुळे अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.

कसे पोहोचाल?:

विसापूर हा किल्ला मळवली रेल्वे स्थानकापासून अतिशय जवळ आहे. मळवली स्थानका पासून लोहगड-विसापुर कडे दिशादर्शक आहेत. मळवली पासून विसापूर पायथा हे अंतर चालत सहज १५ मिनिटात पार करता येते. पुण्यापासून मळवली स्थानकापर्यंत तासा  तासाला लोकल ट्रेन्स आहेत. हा लोकाल चा प्रवास एकाच तासाचा आहे. त्यामुळे दुपारी ऊन चढू लागायच्या आत गडावर पोहोचायचे असल्यास सकाळी ६:३० ची लोकल पकडणे सर्वात उत्तम!

मळवली रेल्वेस्थानकावरून विसापूरकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन मार्ग आहेत. त्यातील पहिला भाजे गावातून तर दुसरा पाटण गावातून जातो. भाजे गावातील लेण्यांवरून जाणारा मार्ग हा तुलनेने सोपा आहे.

भाजे लेणी

छायाचित्र: शौनक खेकळे

भाजे लेण्यांकडील पायऱ्या चढू लागल्यावर साधारणतः अर्ध्या अंतरावर विसापूर कडे बाण दाखविणारी एक पाटी आहे. तिथून लेण्यांचा डोंगर ओलांडला कि चालू होतं विसापूर चं दाट जंगल व वाटेत लागणारे धबधबे! परंतु याच जंगलात तसेच पहिला लेण्यांचा डोंगर ओलांडताना, जंगलात वाट चुकण्याची शक्यता खूपच दाट असल्यामुळे, माहितगार व्यक्तींबरोबर अथवा गावातून वाटाड्या म्हणून एखाद्या व्यक्तीस बरोबर घेऊन जाणे हेच उत्तम!

गडावर काय पाहाल?:

गडावर पोहोचायच्या आधी म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायर्यांपाशी धान्याची दोन मोठी कोठारे आहेत, तसेच हनुमानाचे एक शिल्पही कोरलेले आहे. गडावरही हनुमानाचे मंदिर आहे. याचबरोबर एक दगडी जातं (grinding  wheel ) व तोफा हे सुद्धा आपल्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देते.

गडावरील धान्याचे कोठार

छायाचित्र: किरण हिंगे

विसापूर च्या शेजारीच असलेला लोहगड हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे! तसेच डागडुजी केल्यामुळे लोहागडाचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे.

याचबरोबर गडाच्या पायथ्याशी असलेल्या भाजे लेण्या सुप्रसिद्ध आहेत. या पाहण्यासाठी केवळ ५ रुपये एवढेच नाममात्र शुल्क आहे.

भाजे लेणी

छायाचित्र: गौरव चौधरी

काय विशेष काळजी घ्याल:

विसापूर वर गिर्यारोहणाला जाताना वाट चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. किंबहुना वाट हमखास चुकण्यासाठी हा गड प्रसिद्ध आहे. दर वर्षी वाट चुकून पर्यटक अडकून पडल्याच्या अनेक घटना येथे घडतात, त्यामुळे येथे ट्रेक ला जाताना पुढील काळजी घ्यावी;

येथे गिर्यारोहणाला जाताना आपल्याकडे दिशादर्शक असेल तर उत्तम. याचबरोबर, गडावर न्याहरी साठी कोणतीही सोय उपलब्ध नाही व पिण्यायोग्य पाणीही उपलब्ध नाही.

छायाचित्र: किरण हिंगे

त्यामुळे योग्य ती न्याहारी व भरपूर पाणी बरोबर घेऊन जावे. साधारणतः अर्ध्या उंचीवर एक पठार आहे व येथे २-३ पत्र्याची घरे आहेत. वाट चुकल्यास येथील स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. या स्थानिक लोकांची पाळीव गुरे देखील त्यांच्याच वस्ती च्या आसपास चारताना आढळतात. त्याचबरोबर प्रथमोपचाराचे साहित्य (first aid kit) बाळगणे हे केव्हाही चांगले!

विसापूर वरील काही आठवणी:

विसापूर ला आजपर्यंत दोन वेळा जायचा योग आला व या दोनही वेळेचे अनुभव अविस्मरणीय आहेत. या दोनही वेळेला वाट चुकण्याचा रोमांचक अनुभव आम्हाला आला!

पहिल्या वेळी पावसाळ्यात विसापूर ला गेलो असल्यामुळे अर्थातच गर्द झाडी, खळखळणारे धबधबे यामुळे विसापूरची शोभा उठून दिसत होती. परंतु पहिल्या वेळी आमचा ४०-५० जणांचा गट असल्यामुळे व दोनही वेळेस वाट लवकर सापडल्यामुळे, त्यावेळेचा ट्रेक हा बराच सुखावह होता.

लोहगडावरून विसापूर

छायाचित्र: कौशिक आपटे

दुसर्या वेळी मात्र आम्ही थंडीत विसापूर वर भटकंती साठी गेलो होतो. ४ जणांचा आमचा गट होता. जाताना चढायला ऊन डोक्यावर आल्यामुळे चढताना दमछाक होत होती. परत उतरेपर्यंत आमच्याकडचा पाणीसाठासुद्धा संपला होता. वाटेत एक झरा बघून  आम्ही एक पाण्याची बाटली भरून घेतली होती, परंतु ते पाणी पिण्याजोग नव्हतं. अर्ध्यापर्यंत म्हणजे जेव्हा आम्ही गड उतरून पाठावर आलो तेव्हा साधारणतः दुपारचे १:३० वाजले होते. सर्वांना प्रचंड तहान लागलेली होती, परंतु पायथा पाऊण ते एक तासात गाठता येईल असा आमचा तर्क असल्यामुळे, आम्ही तसेच चालत होतो. पठारावर आल्यावर मात्र आम्हाला ज्या वाटेने आलो ती वाट सापडेना. साधारण एका झाडाची खुण माझ्या लक्षात होती, त्या खुणेच्या डावीकडून आम्ही चालू लागलो. साधारणतः १५ ते २० मिनिटं चालल्यावर आम्हाला वाट चुकली आहे हे लक्षात आलं. पण परत माघारी वळून पाठराकडे चालायचे म्हणजे ३०-४० मिनिटाचे अंतर होते. पठारावर एक छोटे पत्र्याचे घर आहे तेथे आम्हाला सहज स्थानिक लोकं भेटली असती व आम्ही त्यांना रस्ता विचारून खाली उतरू शकलो असतो. परंतु बऱ्याच पुढपर्यंत आल्यामुळे आम्ही माघारी फिरायचा बेत रद्द केला. तसेच पुढे जात राहिलो; थोड्या वेळाने आम्ही अशा जागी येउन पोहोचलो जेथे पायवाट संपली होती व डावीकडे धबधब्याच्या खुणा दिसू लागल्या.

थोडा विचार केल्यानंतर धबधब्याच्या वाटेनी खाली उतरायचे ठरवले. हि वाट पुढे अवघड वाटल्यास परत माघारी वळून, आलो त्या वाटेने पठार गाठायचे ठरले. धबधब्याच्या वाटेनेच आम्ही खाली उतरू लागलो. (ही चूक वाचकांनी करू नये) थोडे अंतर पुढे गेल्यावर आम्हाला, साधारण १५ फूट उंच कडा (rock patch) लागला. कडा उतरायला जरा अवघड होता. एकदा उतरलो तर परत हा कडा चढता येईल याची खात्री वाटत नव्हती. तरीही तो कडा कसातरी धडपडत उतरलो. यापुढे ५ मिनिटेही चाललो नसू तोपर्यंत आधीच्या कड्याच्या दुप्पट उंचीचा व त्याहूनही उतरायला खूपच अवघड असा कडा आम्हाला लागला. उतरताना एक जरी पकड चुकली तरी आम्ही सरळ ३०-३५ फूट खाली पडणार होतो. आता मात्र आमच्यात दोन गट पडले. एका गटाच्या मते हा शेवटचा कडा असावा व हा उतरला कि सरळ वाट असावी व त्यामार्गे पायथ्यापर्यंत  जातं येईल. मला मात्र पायथा जवळपास कुठे असेल याची धुसरशी सुद्धा शक्यता वाटत नव्हती. त्यातच पुढे जर याच्याहून अवघड कडा लागला तर हा कडा परत चढणं केवळ अशक्य होतं. परंतु आमच्या चौघात एक निर्णय होईना, शेवटी चार पैकी तिघांनी परत फिरण्याचा पर्याय निवडला व आम्ही परत आल्या वाटे माघारी फिरलो. आता आल्या वाटेनी पठार गाठायचा होतं. पहिल्या वेळी उतरलेला कडा कसा बसा परत चढलो. परत आम्ही उलटे धबधब्याच्या उगमाकडे आलो. एकदा मागे वळून पहिला तेव्हा भाजे गावातील मंदिराचा कळस दिसला. शेवटी जेथे आम्ही धबधब्याच्या वाटेला येउन मिळालो होतो तेथे येउन पोहोचलो. आम्ही आलो ती पायवाट अचानक नाहीशी झाली होती. खूप शोध घेऊनही पायवाट आम्हाला सापडली नाही.

छायाचित्र: किरण हिंगे

आता आम्ही पुरते हरवलो होतो. आम्ही तसेच जंगल तुडवत वाट काढत वरती जाऊ लागलो परंतु काही केल्या मार्ग सापडेना. थोडे चाललो की अशा ठिकाणी पोहोचत होतो जिथून पुढे जाणे शक्य नव्हते. घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा ४:१५ वाजले होते. म्हणजे अंधार पडायला साधारण १ ते १:१५ तासच उरला होतं. असेच चालत असताना समोरच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली. क्षणभर आम्ही दचकलो पण सुदैवाने त्या झाडीतून एक बैल चालत आला. पठारावरील वस्तीच्या जवळ पोहोचल्याची हि खुण असावी असं आम्हाला वाटलं. मग आम्ही चालत राहिलो, मदतीसाठी हाका मारू लागलो. थोड्याच वेळात पठार लागले व त्यावरील घर स्पष्ट दिसू लागले. थोड्या वेळाने आमच्या आवाजाला प्रतिसाद आला. आता आम्ही वेगाने त्या दिशेने जाऊ लागलो. अखेर आमच्यासारखाच हरवलेला, पण आमच्याहून मोठा अजून एक गट सापडला. त्यांना नुकत्याच गावातल्या एक आजी वाटाड्या म्हणून भेटल्या होत्या. त्या गटाला वर गडाकडील वाट दाखवून त्या आजी आम्हाला वाट दाखवण्यासाठी आल्या. अखेर बरोबर वाटेला लागल्याच्या खुणा सापडल्या. पठारावरील ज्या झाडाच्या डाव्या बाजूने आम्ही वळलो, त्याच्याच उजवीकडून बरोबर वाट होती. परंतु दोनही वाटा पुढे विरुद्ध दिशेला जात असल्यामुळे आमची वाट चुकली. त्यानंतर अर्ध्या तासात आम्ही खाली उतरून पायथ्यापाशी पोहोचलो.

छायाचित्र: शौनक खेकळे

भाजे गावातील मंदिरापाशी गेल्यावर वरती गडाकडे एक नजर टाकली. धबधब्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ज्या कड्यापाशी आम्ही माघारी वळलो, तो कडा व्यवस्थित ओळखू येत होता. त्या कड्याच्या थोडसं पुढे ६० ते ७० फूट खोल दरी होती. पावसाळ्यात येथूनच धबधबा कोसळताना मी पाहिलं होतं. येथून उतरणे पूर्णतः अशक्य होते. त्यामुळे पहिला कडा न उतरता माघारी फिरल्याचे मनोमन समाधान वाटले व माझ्या गिर्यारोहणाच्या छोट्याश्या यादीत या अविस्मरणिय अनुभवाची भर पडली!

 About the Writer:

Hello! I am Niteesh Sane. I am passionate about traveling and I have mostly traveled a lot in Kokan region. I have been trekking in Sahyadri from past few years, but there is yet much to explore!!!

Along with Trekking I am also interested in Marathi literature,
here is my blog link:
I am currently perusing CA course.
Exit mobile version